शिरसाटांची आमदारकीही धोक्यात? भाजपचा डबल गेम?

शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा नाराज आमदारांची चर्चा सगळीकडे पहायला मिळाली. पण त्यात एक लक्षात राहिलेलं नाव म्हणजे औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट. तीनवेळा आमदार झाले, शिंदेंसोबत बंड केला. मविआसरकारविरोधात पहिला लेटर बॉम्ब शिरसाटांनी टाकला पण शिरसाटांना काही मंत्रीपद मिळालं नाही. नवखे अतुल सावे मंत्री झाले पण शिरसाट मात्र तिथेच राहिले. आपल्याला ज्युनिअर व्हावं लागल्याची बोचणी शिरसाट वेळोवेळी बोलून दाखवतात. आता त्याच शिरसाटांच्या आमदारकीला भाजपनं आव्हान दिलंय. शिंदेशाहीच्या या मिशनमुळे शिरसाटांना पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळणार की नाही, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत. 

संजय शिरसाट हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेत. अनुसुचित जाती प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव आहे. शिवसेनेच्या तिकीटावर शिरसाटांची उमेदवारी म्हणजे हमखास विजयाचं गणित असं समीकरणच बनलंय. पण गेल्यावेळी शिरसाटांना तगडं आव्हान मिळालं, ते शिंदे गटाकडूनच.२०१९ च्या निवडणुकीत भाजपला युतीमध्ये औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ हवा होता. त्यासाठी भाजपने आधीपासूनच जोरदार तयारी केली होती. पण मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला. तरीही भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. 

यामागे भाजपचीच ताकद असल्याचं औरंगाबादच्या राजकीय वर्तुळात बोललं जातं. संजय शिरसाट चाळीस हजाराच्या मताधिक्यानं जिंकले. त्यानंतर भाजप-शिवसेना युती तुटली तेव्हापासून राजू शिंदेंनी २०२४ ची तयारी सुरू केली. औरंगाबाद पूर्व मतदारसंघात मतदार, नगरसेवक असलेल्या राजू शिंदेंनी पश्चिममध्ये भाजपचं सशक्त बूथ अभियान हाती घेतलंय. त्यामुळे येत्या निवडणुकीतही शिरसाटांना शिंदेशाहीचं आव्हान मिळणार आहे.मंत्रीपद मिळालं नाही म्हणून अडचण आता भाजपच्या मिशनमुळे आमदारकीही धोक्यात, तेव्हा शिरसाटांचा डबल गेम होऊ शकतो अशी चर्चा औरंगाबादमध्ये रंगली आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.