संघाच्या शाखेत भगवा झेंडा फडकवला जातो, तिरंग्याचं काय? मोहन भागवत म्हणतात…

केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. घर घर तिरंगा मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सगळ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून डीपीवर तिरंगा ठेवावा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं त्याला ही चांगला प्रतिसाद मिळाला. हे सगळं होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र फेसबुक आणि ट्विटरवर आपला डीपी बदलला नाही. तिथे संघाचा ध्वज कायम आहे. यावर विरोधकांनी संघावर जोरदार टीका केली. आरएसएसचे प्रचार प्रमुखांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं तरी विरोधकांच्या टीका सुरुच आहेत.
आता सरसंघचालक भागवत यांनी विरोधकांना यावर उत्तर दिलं आहे. तिरंगा आणि संघाचं नात त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. ‘तिरंगा झेंडा जन्माला आला तेव्हापासून संघाचे तिरंग्याबरोबर घनिष्ठ नातं आहे. फैजपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात तिरंगा फडकविण्यात आला तेव्हा ध्वजस्तंभ ८० फूट उंचीचा होता. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरु. त्यांच्या हस्ते तिरंगा फडकवला गेला. पण जेव्हा तिरंगा फडकविण्यासाठी दोरी ओढली गेली तेव्हा तो मध्येच लटकू लागला. इतक्या उंचावर जावून दोरीचा गुंता सोडविण्याचे धाडस कोणाताच नव्हतं. त्याचवेळी एक तरुण पुढे आला. तो खांबावर चढला, त्याने तो गुंता सो़डवला आणि राष्ट्रध्वज ८० फूट उंचीवर जावून फडकला. ते पाहुन पंडित नेहरु भारावून गेले आणि त्याला अधिवेशनात बोलवून त्याचा सत्कार करु असे म्हणाले. तेव्हा लोकं त्यांना म्हणाली, त्याला बोलावू नका, तो शाखेत जातो. त्याचे नाव किसनसिंग राजपूत. ते संघाचे स्वयंसेवक होते. फैजापूरमध्ये ते राहत होते. जेव्हा डॉ. हेडगेवार यांना ही गोष्ट समजली त्यांनी राजपूतच्या घरी जावून त्याचे कौतुक केले आणि त्याला चांदीची छोटी लोटी भेट म्हणून दिली.’ .