शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार वादात…

शिंदे-फडणवीस सरकाराचा मंत्रिमंडळ विस्तार आज करण्यात आला. एकूण १८ मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला मात्र सगळीकडे चर्चा होतेय ती एकाच मंत्र्याची ती म्हणजे संजय राठोड यांची. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.विशेष करुन संजय राठोड यांच्यावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधल आहे.
शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर खोचक प्रतिक्रिया दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यांनी संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. आता महिला व बालविकास खातं संजय राठोडांना द्या असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे. तसेच मंत्रिमंडळात एक ही महिलेला स्थान न दिल्यामुळे भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपमधील महिला नेत्यांना समानतेच्या ऐवजी द्वितीय श्रेणीतील नागरिकांप्रमाणे वागणूक का मिळते हे समजत नाही असंही प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या आहेत.
संजय राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली पण मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द पुढे जाताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मनसेनेही मंत्रिमंडळ विस्तारावर बोचरी टीका केली असून संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी ट्विटरवरुन एक संजय ने महाविकास आघाडी सरकार बुडवले आता मंत्री मंडळातील हा संजय या सरकारचे जहाज बुडवेल असं दिसतंय अशी टीका केली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि संजय राठोड यांच्यावरून हल्लाबोल केला आहे.चित्रा वाघ यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पूजा चव्हाण हिला न्याय मिळवून देण्यासाठी लढावे, फक्त ट्विट करत बसू नये असा खोचक सल्ला दिलेला आहे. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनीही बोचरी टीका करत संजय राठोड हे युती सरकारमध्ये मंत्री झाल्याने चित्रा वाघ यांनी पक्षाचा राजीनामा देऊ नये, असा टोला लगावला आहे.टीईटी घोटाळ्यातले अब्दुल सत्तार आले म्हणून किरीटभाईंनीही पक्ष सोडू नये! राजकारणात हे चालणारच. दोघांनी दोघांच्या विरूद्ध लढाई मात्र तत्वतः चालूच ठेवावी ! अशी टीका चौधरी यांनी केली आहे.