संजय राऊतांची ती ‘डायरी’ अडचणी वाढवणार !

मुंबईमधील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी, शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली असून ८ ऑगस्टपर्यंत त्यांची कोठडी वाढविण्यात आलेली आहे. ईडीने संजय राऊत यांच्या घरी रविवारी धाड टाकली होती. यावेळी राऊतांच्या बंगल्याची कसून तपासणी करण्यात आली या झडतीमध्ये ईडीला एक डायरी सापडली आहे. ही डायरी तपासाचा एक महत्त्वाचा दुवा ठरु शकते असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
रविवारी जेव्हा ईडीने राऊतांच्या घरी तपास केला तेव्हा साडे अकरा लाख रुपये जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर काही कागदपत्रे आणि डायरी ईडीने जप्त केली.या डायरीत कोड वर्डमध्ये माहिती लिहीण्यात आलेली आहे असे ईडीकडून सांगण्यात आलेले आहे. या कोडमधून कोणाला किती पैसे दिले याची माहिती आहे असा दावा ईडीकडून करण्यात आलाय.
संजय राऊत यांच्या खोलीतून ही डायरी जप्त करण्यात आलेली आहे. या डायरीमध्ये एक कोटी १७ लाख रुपये ज्यांना कोणाला दिले गेले आहेत त्यांची माहिती तसेच नावे सांकेतिक भाषेत लिहील्याचा दावा ईडीने केला आहे. मात्र अद्याप राऊत यांनी याबाबत काहीही माहिती सांगितलेली नाही. ईडीने राऊत यांची कोठडी आठ तारखेपर्यंत वाढवलेली आहे. डायरीत सापडलेले कोड वर्ड आणि त्याची माहिती काय आहे यापर्यंत पोहोचण्याचा ईडी प्रयत्न करत आहे.