संतोष बांगरांची पुन्हा धमकी !

हिंगोलीत आमदार संतोष बांगरांच्या वतीने कावड यात्रेचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. नांदेड येथील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी परिसर हिंगोलीकरांनी भरून गेला होता. जिथे पहावे तिथे मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत आणि अभिनंदन करणार बोर्ड लावण्यात आले होते.या कार्यक्रमात संतोष बांगर यांचा बाहुबली अवतार पहायला मिळाला. मुख्यंत्री शिंदे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच चक्क क्रेनने त्यांना १५१ किलो खोबऱ्याचा हार घालण्यात आला तसेच पुष्पवृष्टी करण्यात आली.
‘आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. आमच्या नादी लागू नका. आम्हाला जर आरे म्हटलं, तर कानाखाली आवाज काढू अशी जाहीर धमकी हिंगोलीच्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना दिली.आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नका. आमच्या नादी लागू नका. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत’ असेही संतोष बांगर म्हणाले.
हिंगोलीमधील गांधी चौक येथे मुख्यमंत्र्यासाठी खास सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांचे भरभरून कौतुक केले. ‘संतोष बांगर हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा ढाण्या वाघ आहे. तिकडे राहून एक-एक आमदार पाठवत होता,’ असं पहिल्यांदाच थेटपणे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी गुपित फोडलं. हिंदुत्व पुढे नेण्याचं काम करतोय. मग आमचं काय चुकतंय?,’ असा सवाल एकनाथ शिंदेंनी यावेळी विचारला.