शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शरद पवार मैदानात?

यंदाचा शिवाजी पार्क येथे होणारा दसरा मेळावा अभूतपूर्व असेल असेच म्हणावे लागेल. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना दसरा मेळावा घेण्याची विनंती केलीय. तसं पाहिलं तर शिवसेना दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेत असते. तरीही शिवसेनेला अजून शिवाजी पार्क मैदानात मेळावा घेण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच आता या वादात राष्ट्रवादीने उडी घेतलीय.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दसरा मेळावा या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिलाय. पवारांच्या या सल्ल्यामुळे ते शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मैदानात उतरले असल्याची जौरदार चर्चा सुरू आहे.
शरद पवार यांनी मीडियाशी बोलताना हा सल्ला दिला. मेळावा घेण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. पण वाद टाळले गेले पाहिजेत. मुख्यमंत्री राज्याचे असतात. ते एका पक्षाचे नसतात. त्यामुळे त्यांनी सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. सामोपचाराने त्यांनी वाद सोडवला पाहिजे, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांचा हा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मानतात की मैदानासाठीचा आग्रह कायम ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.