राणेंशी पंगा घेतल्याचा केसरकरांना फटका… शिंदेंनी घेतला कठोर निर्णय?

भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण करणारी वक्तव्य केल्यामुळे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी होण्याची शक्यता आहे. केसरकर यांच्या जागी किरण पावसकर यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण होतील अशी वक्तव्ये केसरकर यांनी करु नयेत अशी ताकीद त्यांना देण्यात आलीय अशी माहिती आहे.
शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांची बाजू घेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. आदित्य यांची बदनामी करण्यात राणे पिता-पुत्राचा मोठा वाटा आहे असेही केसरकर म्हणाले होते.’सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणेंनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आदित्य यांच्यावर निशाणा साधला. याबाबत मी पंतप्रधान मोदी यांच्याशी वैयक्तीक संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होतायावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली होती. पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबत प्रेम आणि आदर असल्याचे दिसून आले.हे प्रकरण मोदींपर्यत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला.’ दरम्यान आज ( ६ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेवून केसरकरांनी युटर्न घेत आपण मोदींकडे राणे यांची तक्रारच केली नव्हती, असं म्हटलं.
शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतर केसरकरांनी माध्यमांसमोर शिंदे गटाची बाजू स्पष्ट केली होती. जनतेसमोर आणि माध्यमांसमोर ते जोमाने शिंदे गटाचे बोलणे मांडत होते. अगदी सासवज येथे झालेल्या मेळाव्यात आम्हाला केसरकरांसारखा संत मिळाला असं कौतुक मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं होतं. मात्र केसरकरांनी राणेंवर केलेल्या टीकेमुळे त्यांचे प्रवक्तेपद जाण्याची शक्यता आहे.