शिंदे गट आदित्य ठाकरेंना युवा सेना प्रमुख पदावरून हटवणार?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. आम्हीच खरी शिवसेना असे ठाकरे गट आणि शिंंदे म्हणत आहे. हा वाद सुप्रीम कोर्टात सुरु असून अद्याप त्यावर कोणताही निकाल आलेला नाही. दरम्यान आता शिंदे गटाने युवा सेनेकडे आपले लक्ष वळविले आहे.युवा सेना प्रमुख पदी शिंदे गटाची व्यक्ती बसवण्याची मागणी समोर आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदेंना युवा सेना प्रमुख करण्याची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केलीये. महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंसमोरच ही मागणी करण्यात आलेली आहे.
बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी प्रतापराव जाधव यांनी ही मागणी केली. आपल्याला युवा सेनेचं काम वाढवायचं आहे. त्यासाठी श्रीकांत शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी. श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा अशी मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाने युवा सेनेतही बदल केले होते. शिंदे गटाने वरूण सरदेसाईंची युवा सेनेच्या राज्य सचिव पदावरून हकालपट्टी केली होती. तर किरण साळींची राज्य सचिवपदी नियुक्ती शिंदे गटाने केली होती.त्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी किरण साळींची हकालपट्टी केली होती. त्याचबरोबर युवा सेनेचे पदाधिकारी असलेले प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक यांच्यावरही कारवाई करण्यात आली होती. पूर्वेश सरनाईक यांनी ठाण्यातील युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली होती. तसेच त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.आदित्य ठाकरे शिंदे गटाच्या निशाण्यावर असून पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना लक्ष्य केले होते.