भाजपला हायजॅक करण्याचा शिंदे गटाचा प्लॅन ! पक्षवाढीसाठी नेत्यांची सोलापुरातून सुरुवात

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली आणि शिवसेनेत उभी फूट पडली. आता तर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरपारची लढाई दिसून येतेय, कोणाचं पारडं जास्त जड यात जणू चढाओढ सुरु आहे. अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील होत आहेत. तर शिंदेनी ठाकरे गटातील नेत्यांना आपल्याकडे ओढण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे त्यात काही प्रमाणात शिंदे गटाला यशही आलंय. अशातच शिंदे गटाचा ताकद दाखविण्याचा प्लॅन भाजपच्या माथी लागू शकतो असा कोणी विचारच केला नसावा पण हा विचार शिंदे गटातील म्हाडा लोकसभा संपर्क प्रमुख यांनी. संजय कोकाटे यांनी असे वक्तव्य केले आहे की अख्ख भाजप शिंदे गटात विलीन व्हावं. आता तुम्ही विचार करत असाल हा नक्की काय प्रकार आहे.
सोलापुरात मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाची जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. नुकतच सुधाकर कवडे यांना आपल्या गटात सामील करुन त्यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान अजून कोणाला आपल्या गटात सामील करुन घेणार असा प्रश्न कोकाटे यांना विचारला तर ते म्हणाले सुधाकर कवड्यांच्या सहसंपर्क पदावरून आपण अनेक अंदाज काढताय पण मी सांगतो कल्याण काळे काय, विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख यांनी सुद्धा आमच्या पक्षात यावे अशी आमची अपेक्षा आहे. ते होणार की नाही हे माहित नाही पण पक्षवाढीसाठी सगळ्यांना विनंती करणे हे तर आमचे कामच आहे. पण या पक्षात महाराष्ट्राचं अख्ख भाजप विलीन व्हावं आमच्या शिंदेगटात असं शिंदे गटाचा कार्यकर्ता म्हणून वाटणं स्वाभाविक आहे.
पक्षवाढीसाठी या जिल्ह्यातील चांगले चांगले नेते आमच्या संपर्कात आहे आणि त्यांना आम्ही पक्षात घेण्याचा प्रयत्न करू आहेत असेही कोकाटे यांनी स्पष्ट केलंय. पक्ष फोडणे, पक्ष प्रवेश आणि नव्या नियुक्त्या हे सध्या शिवसेना गटात जोरदार सुरु आहे. असे असताना ज्या भाजपसोबत जावून शिंदे गटाने सरकार स्थापन केले त्याच भाजपला फोडण्याचा प्लॅन शिंदे गटाचा आहे का असा सवाल आता समोर येतो आहे.