“शिंदे साहेब मर्द आहेत, उद्धव ठाकरेंनाच असले बायकी…” लटकेंच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकल्याच्या आरोपावर शिंदे गट संतापला

आता राज्यात लक्ष अंधेरी पोटनिवडणुकिकडे लागलेलं आहे. ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवरुन ठाकरे आणि शिंदे यांच्यात जोरदार संघर्ष, आरोप- प्रत्योरोप पहायला मिळत आहेत. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होवू नये म्हणून राज्य सरकार मनपा आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर दबाव टाकतोय असा आरोप अनिल परब आणि खासदार अरविंद सावंत यांनी केलाय.
यावर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दबाव आणण्यासाठी हे काय कोविडमधलं टेंडर आहे का? असा प्रश्न उपस्थित करुन अनिल परब यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत असे पावसकर म्हणालेत. एखाद्याला कामावर ठेवण्यासाठी दबाव आणला जात असेल तर समजू शकतो पण एखाद्याचा राजीनामा स्वीकारु नये यासाठी दबाव आणल्याचं हे देशातील पहिलंच प्रकरण असावं असे पावसकर म्हणालेत.
ठाकरे गटाकडूनच आपलं राजकारण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या रमेश लटकेंनी शिवसेनेसाठी एवढी कामे केली, त्यांच्या पत्नीला तुम्ही शिंदेंकडे गेला होतात का? असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे असेही पावसकर म्हणालेत. एखाद्या आमदाराच्या पश्चात त्याची पत्नी निवडणुकीला उभी राहत असेल तर तिला आपल्या बाजूने बोलावण्याइतके घाणेरडे राजकारण एकनाथ शिंदे कधीच करणार नाहीत. एकनाथ शिंदे मर्द आहेत. ४० लोकांना सोबत नेलं आणि मुख्यमंत्रीपदी बसले. एखाद्या महिलेला बोलावून असले काही धंदे ते करणार नाहीत. उद्धव ठाकरेंना असले बायकी धंदे शोभतात अशी घणाघाती टीका पावसकर यांनी केली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपा आणि आम्ही सर्व निवडणुका एकत्र लढणार आहोत. आम्ही लवकरच आमचा उमेदवार जाहीर करु. यासंबंधी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असेही पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.