शिंदे गटातील कोणत्या आमदाराने दिलं ठाकरेंना प्रतिआव्हान ? 

शिवसेनेतील ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडलं ते आपल्याला माहितच आहे. आमदारानंतर खासदारांनीही शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. दिवसेंदिवस एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढते आहे. दरम्यान शिवसेनेचे युवा नेता आदित्य ठाकरे यांनी राज्यभर शिवसंवाद यात्रा सुरु केली आहे. शिवसेनेची भूमिका पटवून देण्यासाठी ते महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. बंडखोर आमदारांना आपल्या प्रत्येक भाषणातून आदित्य ठाकरेंनी आव्हान दिलंय. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून दाखवा असे आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरेंना शिंदे गटातील एका आमदाराने प्रतीआव्हान दिले आहे.
तुम्हीसुद्धा उत्सूक असाल ते आमदार कोण? हे जाणून घ्यायला. ते आमदार आहेत अब्दुल सत्तार, औरंगाबादमधील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, २०१९मध्ये काँग्रेस सोडून त्यांनी भगवा हातात घेतला होता. मात्र सध्या शिंदेगटासोबत आहेत.सत्तार म्हणालेत, ‘मला जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची परवानगी दिली तर मी लगेच राजीनामा देईन. मी निवडणुकीसाठी तयार आहे आणि मी किती मतांनी निवडून येईन हे सुद्धा दाखवून देईन. मुख्यमंत्री शिंदे ३१ तारखेला संभाजीनगरच्या दौऱ्यावर येत आहेत तेव्हा लाखो शिवसैनीक त्यांच्या स्वागतासाठी हजर असतील.’
सत्तार पुढे म्हणाले, ‘शिंदेगटात मराठवाड्यातील आमदार निवडणुकीत पडणार नाही याची खात्री मी देतो. मी २५ वर्षांपासून आमदार, तीनवेळा मंत्री झालो आहे तर ते एकदा मुख्यमंत्री झाले आहेत असा टोला देखील सत्तार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. निवडणुकिआधी भाजप-शिवसेना युती होती तो धर्म आम्ही सांभाळतो आहोत. आधी नेत्याची बदनामी करायची मग त्यालाच सांगायचे मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत अशी दुटप्पी भूमिका राजकारणात शोभत नाही’