पद्मविभुषण शिंजोंचे भारताशी होते घनिष्ठ नाते

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या झाली आहे. त्यांच्यावर एका प्रचारसभेत गोळीबार करण्यात आला. त्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. तब्बल 9 वर्षे जपानची धूरा वाहणाऱ्या शिंजो आबे यांचे वडील होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. त्यांना व त्यांची पत्नी अकी आबे यांना एकही अपत्य नाही. दोघांनी प्रदिर्घ काळापर्यंत इन्फर्टिलिटीचे उपचार घेतले. पण, त्याचा कोणताही फायदा झाला नाही. कधीकाळी DJ असणाऱ्या अकी व शिंजो यांची प्रेम कहाणी फारच रंजक आहे.
शिंजो आबेंना मूल दत्तक घ्यायचे होते
लग्नानंतर प्रदिर्घ काळ उपचार करुनही आबे दाम्पत्याला अपत्य झाले नाही. त्यामुळे आबेंनी एखादे मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली. पण जपानमध्ये मूल दत्तक घेण्याची प्रथा नाही. त्यामुळे त्यांची पत्नी अकी आबे यांनी त्याला विरोध दर्शवला. उल्लेखनीय बाब म्हणजे अत्यंत कमी जन्मदर असणाऱ्या जपानमध्ये दत्तक घेण्यासाठी मूल शोधणे हे ही काही सोपे काम नाही.
आबेंच्या पत्नीने डीजे म्हणूनही काम केले
शिंजो आबे यांच्या पत्नी अकी एक व्यावसायिक डीजे होत्या. 1980-90 च्या दशकात रेडिओवर अकीचे कार्यक्रम येत होते. ते शिंजो मोठ्या आवडीने ऐकत होते. अकी तेव्हा जपानी तरुणांत चांगल्याच लोकप्रिय होत्या. शिजोंनाही त्यांचा आवाज फार पसंत होता. त्यानंतर दोघांचे लग्न झाले. अकी यांच्या बॉसने त्यांची शिंजो यांच्यासोबत भेट घडवून आणली होती.अकी आबे यांचे वडील जपानचे एक मोठे उद्योगपती होते. तर दुसरीकडे शिंजो आबे यांचे कुटुंब राजकारणाशी संबंधित होते. शिंजोंचे आजोबा व आईचे वडील दोघेही जपानचे पंतप्रधान होते. तर त्यांच्या वडिलांनीही जपानचे परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे.
शिंजोंसोबत भारत दौऱ्यावर आल्या होत्या अकी
शिंजो आबे व पंतप्रधान मोदींची केमिस्ट्री खूप चांगली होती. शिंजोंच्या कार्यकाळातच 4 शक्तिशाली देशांची ‘क्वाड’ संघटना अस्तित्वात आली होती. या संघटनेत भारत व जपानसह अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे. आबेंच्या भारत दौऱ्यात अकीही त्यांच्यासोबत आल्या होत्या. या दोघांच्या स्वागतासाठी अहमदाबादेत एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे हे दाम्पत्य साबरमती रिव्हर फ्रंटच्या किनारी शतपावली करताना दिसले. यावेळी अकी यांनी भारतीय पेहराव घातला होता. शिंजोही पारंपरिक कुर्ता-पायजम्यात दिसून आले होते.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान
शिंजो आबे जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिले. त्यांच्या कार्यकाळात भारत-जपानचे मैत्रीसंबंध एका नव्या उंचीवर पोहोचले. त्यामुळे भारत सरकारने 2021 मध्ये त्यांचा पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते.