उद्धव ठाकरे पुन्हा दाखवणार तोच पॅटर्न? दसरा मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झालेत. ठाकरे गट आणि शिंदे गट, दोन्ही गट आम्हीच खरी शिवसेना हे पटवून देण्यासाठी जीवाचं रान करताना दिसत आहेत. त्यातच आता दसरा मेळावा येतो आहे. बंडानंतर शिंदे गटाचा पहिला मेळावा आहे तर शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय. शिवाजी पार्क मैदानावर ठाकरेंचा दसरा मेळावा होतो आहे. तर शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर आहे.
मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून मोठी रणनीती आखण्यात आलेली असून जोरदार शक्तीप्रदर्शनाचा दावा करण्यात आलेला आहे.शिंदे गटाचा दसरा मेळावा रेकॉर्ड ब्रेक असेल असा दावा शिंदे गटातील आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलाय. एसटीच्या ४ हजार बसेसचा वापर शिंदे गटाकडून केला जाणार आहे. आमच्या भगव्या झेंड्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो असेल अशी माहितीसुद्धा शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यानं दिलेली आहे.
दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटानंही जोरदार तयारी सुरू केलेली आहे. शिवसेनेला पुन्हा उत्साहपूर्वक उभं करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आहे.दसरा मेळाव्यापूर्वी गोरेगावातील नेस्को मैदानात गटप्रमुखांचा मेळावा झाला होता त्यात खासदार संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे दसरा मेळाव्यातही राऊत यांच्या नावाची खुर्ची रिकामी ठेवण्यात येऊ शकते असे ठाकरे गटातील एका पदाधिकाऱ्याने सांगितलेले आहे. राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटक झाली असून त्यांचा मुक्काम तुरुंगात आहे. दरम्यान ठाकरे आपल्या कट्टर मित्रासोबत खंबरीपणे उभे आहेत त्याची प्रचिती गोरेगावातील मेळाव्यात आलेली होती. ठाकरेंच्या या कृतीची बरीच चर्चा देखील झाली.