सस्पेन्स संपला ! शिंदेना धक्का, उद्धव ठाकरेंनी मैदान जिंकलं

दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानावर आता शिवसेपा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाच आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिलेली आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाला मात्र, झटका बसलाय. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने महापालिकेकडे परवानगी मागितली होती. त्यांनतर सदा सरवणकर यांनी देखील आम्हाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घ्यायचा आहे असे सांगत अर्ज दाखल केला होता. महापालिकेनं कायदा-सुव्यवस्थेचं नाव घेत दोन्ही अर्ज फेटाळून लावले होते. त्यानंतर शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनी शिवसेनेच्या याचिकेला विरोध करणारी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती.
आज या प्रकरणी शिवसेना, शिंदे गट आणि मुबई महापालिका यांचा युक्तीवाद न्यायालयाने ऐकून घेतला आणि निकाल दिला. सदा सरवणकर यांना शिवसेनेकडून याचिका करण्याचा अधिकार नसल्याच्या युक्तिवाद मान्य करत मुंबई उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. तर निकाल देताना महापालिकेला न्यायालयाने फटकारले. महापालिकेनं अधिकारांचा गैरवापर केला न्यायालयाने म्हटले आहे.