शिवसेना जायंट किलरच्या शोधात, ही आहे यादी !!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना अद्याप सावरलेली नाही. आमदार, खासदार, नगरसेवक अगदी जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख सुद्धा शिंदेना पाठिंबा देत आहेत. पक्ष जरी एक असला तरी ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झालेत. शिवसेनेला राज्यात पुन्हा उभारी देण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली. आता तर आगामी काळात शिवेसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचा दौरा करणार आहेत. शिवसेना संकटात असतानाच महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आलेल्या आहेत. शिंदेगट भाजपच्या साथीने मैदानात येणार यात शंकाच नाही. तर दुसरीकडे मनसे भाजपसोबत जाणार अशी शक्यता वर्तविण्यात येतेय.अशा संकट काळात आता शिवसेनेला गरज आहे ती नव्या नेत्याची.
जिथे जिथे शिवसेनेने नेतेमंडळी गमावली त्याठिकाणी शिवसेनेचे नवे नेते किंवा जायंट किलर पक्षात कसे येतील यासाठी शिवसेना अथक प्रयत्न करतेय.दरम्यान काही जायंट किलर शिवसेनेच्या हाती लागलेत तर काही पक्षातच आहेत. नुकतीच शिवसेनेने संभाजी बिग्रेडसोबत युती केली आणि आम्ही मराठा समाजासोबत आहोत हे दाखवून दिलं. त्यामुळे आगामी काळात हिंदुत्वाबरोबरच आक्रमक मराठा हाही शिवसेनेचा अजेंडा असू शकतो.
ठाणे म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबत राजकारणात मोठे झालेले आणि ठाण्यातील शिवसेनेचा ढहाण्या वाघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी बंड केला. आता ठाण्यात शिवसेनेला बळ देण्यासाठी आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांना शिवसेनेनं ठाणे जिल्हाप्रमुखपद देत त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केलाय. आता आगामी निवडणुकित केदार दिघे शिवसेनेसाठी जायंट किलर ठरणार का हे पहावं लागणार आहे.
आपल्याला आठवत असेल शिंदेंच्या बंडाचा सगळ्यात मोठा फटका बसला तो मराठवाड्यात. एकट्या औरंबादमधील तीन मंत्री शिंदे गटात आहेत तर संजय शिरसाट यांना मंत्रीपद मिळाले नसल्याने नाराज असल्याचं बोललं जातंय.अशा कठिण स्थितीत शिवसेनेने औंरागाबादमध्ये अंबादास दानवे यांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेने दिले आहे. यासाठी काँग्रेसचा रोष ओढावून घेतला पण आगामी काळात दानवेंना जायंट किलरची जबाबदारी पाडावी लागणार यात शंकाच नाही.
शिवसेनेने तळकोकणात वैभव नाईक तर चिपळूणात भास्कर जाधव यांना जायंट किलर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठीच शिवसेना नेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर पुणे जिल्ह्याची जबाबदारी वरळीतील शिवसेनेचे विश्वासू नेते सचिन अहिर यांच्याकडे देण्यात आलीय. जळगावात शिवसेनेचे गुलाबराव पाटील होते पण आता ते शिंदे गटात असल्यामुळे शिवसेनेचे जिल्ह्याध्यक्ष गुलाबराव वाघ यांना गुलाबराव पाटील यांच्यासाठी जाएंट किलर म्हणून पाहिलं जातंय. गुलाबराव वाघांनी पाटलांना सतत साथ दिलीय त्यामुळे ते जाएंट किलर ठरतील का हे निवडणुकीच्या मैदानातच समजणार आहे.