संजय राऊतांचा कारागृहातील मुक्काम वाढला

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीनं कोठडीत वाढ करण्यात आली आहे. संजय राऊतांना आणखीन 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत संजय राऊतांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयानं दिले आहेत. दरम्यान, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. याच प्रकरणी संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे.
पत्राचाळ प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना 31 जुलै रोजी ईडीनं अटक केली होती. 8 दिवसांच्या ईडी कोठडीनंतर त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. ईडी कोठडी संपल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तिथे ईडीनं त्यांच्या कोठडीची मागणी केली नाही, त्यामुळे त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली होती. आर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांना घरचं जेवण आणि औषधं पुरवण्याची मुभा न्यायालयानं दिलं होती.