संजय राऊतांचा मुक्काम आता आर्थर रोड तुरुंगात

पत्राचाळ प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सेशन कोर्टाने २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता संजय राऊत यांचा पुढील मुक्काम आर्थर रोड तुरुंगात असणार आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली होती. तेव्हा पासून राऊत ईडीच्या कोठडीत आहेत. कोर्टाने राऊतांना दुसऱ्यांदा सुनावलेली ईडीची कोठडी आज संपली म्हणून त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. राऊतांच्या वकिलाने जामीनाची मागणी केली तर ईडीने चौकशीसाठी कोठडीची मागणी केली नाही त्यामुळे कोर्टाने त्यांना दिलासा देत न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांना ईडी कोठडीप्रमाणे घरचे जेवण, औषधे पुरविण्याची मुभा, हवेशीर खोली अशी मागणी केली असता, कोर्टाकडून आर्थर रोड तुरुंग प्रशासनाबरोबर बोलण्यास सांगितले आहे.
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांचा थेट हात असल्याचा आरोप ईडीने केला आहे. संजय राऊत यांचे भाऊ प्रवीण राऊत पत्राचाळची डेव्हलपमेंट पाहत होते.त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले.राऊत कुटुंबाला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट फायदा झाल्याचे बोलले जातेय. या प्रकरणात प्रवीण राऊत यांच्यावर कारवाई झाली पण खरे आरोपी संजय राऊत असून तेच प्रवीण राऊतांना पुढे करुन व्यवहार करत होते असे आरोप ईडीने केले आहेत.