शिवसेनेच्या गिरगावमधील दहीहंडी पोस्टर्सची का होतेय चर्चा?

मुंबईमधील दहीहंडी उत्सव अगदी पाहण्यासारखा असतो. सण-उत्सवानिमित्त जागोजागी पोस्टर आणि बॅनर दिसून येतात.दरम्यान गिरगावातील एक पोस्टरची खास चर्चा होतेय. हे पोस्टर शिवसेनेतर्फे लावण्यात आलंय यामध्ये कोणावर ताशेर किंवा खडेबोल लिहीलेले नाहीत, मग याची चर्चा का होतेय?
गिरगाव येथील दहीहंडी कार्यक्रमासाठी शिवसेनेतर्फे लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर तेजस ठाकरे यांचा ही फोटो झळकलेला आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त फोटो आहे म्हणून चर्चा होते आहे का तर नाही, त्या फोटोवर लिहीलं आहे युवाशक्ती गिरगावातल्या दहीहंडी पोस्टर्सवर ‘युवा शक्ती’ झळकली आहे त्यामुळे पुन्हा एकदा तेजस ठाकरे राजकारणात एन्ट्री करणार अशी चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात कधी येतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.
महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत, राज्यात शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे या पार्श्वभूमीवर तेजस राजकारणात आले तर त्याचा चांगलाच फायदा शिवसेनेला होणार आहे. गिरगावातील हे पोस्टर पाहून दहीहंडी उत्सवानिमित्त तेजस ठाकरे यांचं राजकीय लाँचिंग करण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. युवा नेतृत्व आदित्य ठाकरे तर युवा शक्ती म्हणून तेजस ठाकरे असे स्पष्टपणे त्या पोस्टरवर लिहीले आहे.शिवसेनेतील बंडाळी मोडून तसेच शिवसैनिकांमध्ये उत्साह भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मोठी रणनीती आखली आहे अशी चर्चा शिवसैनिक करत आहेत.
जेव्हा तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीचा विषय येतो तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आठवते. उद्धवचा नंबर दोनचा मुलगा माझ्यासारखाच सेम आहे. तेजसच्या आवडीनिवडी माझ्याशी जुळतात असे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे झालेल्या भाषणात म्हटले होते. तेजस ठाकरे हे विविध देशांतील जंगलांमध्ये प्राण्यांवर तसेच जैव विविधतेवर संशोधन करत आहेत. दरम्यान शिवसेनेच्या संकट काळात आदित्य ठाकरे यांच्या बरोबरीने तेजस राजकारणात उतरतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.