३ नाव आणि ३ चिन्हांच्या पर्यांयांसह ठाकरे मैदानात ! चेंडू आयोगाच्या कोर्टात

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आज शिंदे गटावर नाराजी व्यक्त केली.बाळासाहेबांचं नाव न घेता जनतेत जावून दाखवा, तुम्ही शिवसैनिकांना छळता जराही माणुसकी शिल्लक आहे का? असा सवाल उपस्थित करुन ‘हे अती होतंय’ असा सज्जड दमसुद्धा त्यांनी शिंदे गटाला दिला.
रविवारी जनतेसोबत संवाद साधत असताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्हंदेखील दाखवून दिली आहेत . त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल या चिन्हांचे फोटो उद्धव ठाकरेंनी दाखवले आहेत. शिवाय नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं निवडणूक आयोगाला दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मी डगमगणारा नाही, लढणारा आहे. असं म्हणत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये ताकदीने लढणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यांनी निवडणूक आयोगाला आवाहन करत आमचं नाव आणि चिन्हं आम्हाला तातडीने द्या असेही सांगितले.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाले. पण अखेर न्यायदेवता ‘न्याय’ या शब्दाला जागली आणि न्याय दिला. हा सामान्यांचा मेळावा होता. शेवटी उद्धव ठाकरे म्हणजे कोण? तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यामुळे मला महत्त्व आहे. शिवसेनेसाठी अनेकांनी जीव दिलेला आहे परंतु मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा कायम ठेवलाय. आजही मी लढणार आहे. कारण माझा संघर्षाचा वारसा आहे, न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्याचं ठाकरे यांनी सांगितले.