‘अब्दुल सत्तारां’ना शह देण्यासाठी ‘शिवसेने’ची रणनीती तयार !

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा जोरदार संर्घष बघायला मिळणार आहे. शिंदे गटाने शिवसेनेचे आमदार, खासदार फोडून शिवसेनेला मोठं खिंडार पाडलं आहे पण शिवसेना आता गप्प बसणार नाही. पुन्हा नव्याने शिवसैनिक उभे करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तयारीला लागले आहेत. मराठवाड्यात शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. या बंडखोर आमदारांना धडा शिकविण्यासाठी शिवसेनेत रणनीती तयार झाली आहे.
शिंदे गटातील बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांना धडा शिकविण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली आहे. शिवसेनेच्या वतीने सत्तारांच्या मतदार संघात शिवसेना भव्य मेळावा घेणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत त्यानंतर या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना सत्तारांना धडा शिकविण्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन करेल असं शिवसेना नेता चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे. सत्तार यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळणार नाही याची भीती वाटते आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यांना बोलावून शक्तीप्रदर्शन करणार आहेत असे वक्तव्य खैरे यांनी केले आहे. आपण सत्तारांच्या शक्तीप्रदर्शनाला घाबरत नाही असेही खैरे यांनी स्पष्ट केले आहे.
मराठवाड्यातील बंडाची ताकद स्पष्ट करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड विधानसभा मतदार संघात मेळाव्याचे आयोजन केले आहे. औरंगाबादमधील शिंदे गटात असलेले पाच आमदार औरंगाबाद विमानतळापासून सिल्लोड मतदार संघापर्यंत मोठी रॅली काढणार आहेत. दरम्यान सिल्लोडकरांना एकनाथ शिंदे गट विरुद्ध उद्धव ठाकरे गट यांचे भव्य शक्तीप्रदर्शन पहायला मिळणार आहे पण आता जनता कोणाला साथ देते हाच मोठा प्रश्न आहे.