सेनेच्या दसरा मेळाव्याआधी पोस्टर व्हायरल, नेते मात्र अलिप्त?

दसरा मेळावा सध्याच्या राजकारणातील एक तापलेला मुद्दा असेच म्हणावे लागेल. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर दोन गट तयार झाले त्यामुळे खरी शिवसेना कोणाची यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार लढाई सुरु आहे. यासंदर्भातील वाद कोर्टात गेलेला असला तरी शिंदे आणि ठाकरे एकमेकांना टक्कर देण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत असे दिसतेय.आता दसरा मेळावा आणि शिवसेना म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
दसरा मेळाव्यावरुन शिवसेनेत मोठा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. खरंतर कोणालाच अद्याप शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळालेली नाही तर उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार केलेला आहे. दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होतंय त्यात आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची अशा टॅग लाईनचे हे पोस्टर आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासंदर्भातील हे पोस्टर व्हायरल जरी झालं असलं तरी शिवसेनेच्या अधिकृत साईट्स किंवा सोशल मीडियावर ते दिसत नाही. शिवसेना नेत्यांच्या ट्विटर हँण्डरलवर ही ते पोस्टर दिसत नाहीए.त्यामुळे हे पोस्टर ऑफिशिएल की अनऑफिशिअल हा संभ्रम निर्माण झालाय. हे पोस्टर व्हायरल झाल्यामुळे त्याची जोरदार चर्चा होतेय.
शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरामेळावा घेण्यासाठी परवानगी मिळालेली आहे पण अद्याप ठाकरे गटाला कोणत्याही मैदानावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या ज्या गर्जनेची आतुरतेने वाट पाहत आहेत ती नक्की कोणत्या मैदानावरुन होणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे.