उद्धव ठाकरेंचा युतीसाठी फडणवीसांना फोन? केसरकर म्हणाले…

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना फोन करुन एकनाथ शिंदेंना बाजूला करा, आपण युती करु असा सल्ला दिला अशी चर्चा होत असताना, शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे यांनी खरंच फडणवीस यांना फोन केला का यातील सत्य समोर आले पाहीजे. हर्षल प्रधान म्हणत आहे हे खोटं आहे. मग अनिल परब यांचा फोन तपासा, त्यांच्या फोनमधून फडणवीस यांना फोन गेला असेल तर नक्की तसं घडलं असेल असे पत्रकार परिषदेत केसरकर म्हणाले. जर शिंदेंना बाजूला करून युती करायची असेल तर मग भाजपाला नकार का देत होतात? असा प्रश्न दीपक केसरकरांनी पत्रकार परिषदेत विचारला.
केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांचा फडणवीस यांना फोन ही बातमी मी जेव्हा वाचली तेव्हा विचार केला जर पक्षामधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असे बोलत असतील आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांचं काय होत असेल? असा प्रश्न देखील केसरकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केसरकर बोलत होते. शिवसंवाद यात्रेत आदित्य ठाकरेकडून होत असलेल्या जहरी टीकेवरदेखील त्यांनी नाराजी व्यक्त केली.
शिवसेना बाळासाहेबांची आहे आणि ते एकवचनी होते. शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचं वचन दिलं होतं पण ते त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी बंड केला नाही. जेव्हा उद्धव ठाकरेंनी शिंदेंना भेटायला बोलावलं आणि माझं मुख्यमंत्रीपद तुम्हाला देतो असे सांगितले त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या डोळे पाणावले होते तिथेच त्यांची एकनिष्ठता दिसून येते. मुख्यमंत्रीपद नको पण काँग्रेस-राष्ट्रवादी सोबतची साथ सोडा ते आपल्याला संपवायला निघाले आहेत. तुम्हाला आघाडी का तोडावीशी वाटली नाही याचं उत्तर द्या,” अशी विचारणा पत्रकार परिषदेत केसरकरांनी केली.
या पत्रकार परिषदेत केसरकरांनी आदित्य ठाकरेंच्या टीकेवर नाराजी व्यक्त केली. आदित्य तरुण आहेत त्यामुळे कसं बोलावं, कसं वागावं यासाठी त्यांनी वडिलांचे उदाहरण घ्यावे. कारण आदित्य इतर नेत्यांबद्दल जे काही बोलत आहेत त्यामुळे वातावरण चिघळण्याची शक्यता आहे. ते माझ्या निम्या वयाचे आहेत पण जेव्हा आदित्य येतात मी उठून उभा राहतो कारण तो त्यांच्या आजोबांचा मान आहे. आम्ही गप्प आहोत, काही बोलत नाही याचा अर्थ आमच्याकडे मुद्दे नाहीत असा नाही. शिवसैनिक मातोश्रीबाहेर रांग लावतात आपल्या पाठीवरुन तो हात फिरावा अशी माफक त्यांची अपेक्षा असते पण तसं काही वर्षात घडलं नाही. शिवसैनिकांना गृहीत धरु नका अन्यथा तो पेटून उठेल असेही केसरकरांनी ठामपणे सांगितले.