दसरा मेळावा २०२२ : आता शिंदे गट आणि शिवसेना न्यायालयात भिडणार

शिवसेनेचा दसार मेळावा वादात सापडला आहे. आपणच खरी शिवसेना हा वाद कोर्टात असताना आता शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार यावरुन शिंदे आणि ठाकरे गटात वाद निर्माण झालाय.दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय तर दुसरीकडे उद्धव यांना हे मैदान मिळू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडूनही जोरदार रणनीती आखली जातेय. शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल केलेली आहे.
महिनाभरापूर्वी अर्ज करूनही मुंबई महानगरपालिकेने शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्यास परवानगी न दिल्याने शिवसेनेनं हायकोर्टात धाव घेतलीय. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटातर्फे आमदार सदा सरवणकर यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. हायकोर्टाचीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो आहे असा आरोप शिंदे गटाने अर्जात केलेला आहे. मी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा प्रतिनिधी म्हणून हा अर्ज केलाय असंही आमदार सरवणकर यांनी अर्जात स्पष्ट म्हटलंय.