शिंदे गटाला मिळालं नवं चिन्ह : ‘बाळासाहेबांची शिवसेना’ ढाल-तलवारीने ओळखली जाणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल-तलवार हे निवडणूक चिन्ह मिळालेले आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी एका परिपत्रकाद्वारे ही माहिती जाहीर केलेली आहे. शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तळपता सुर्य, पिंपळाचे झाड आणि ढाल-तलवार अशा ३ चिन्हांचे पर्याय देण्यात आले होते. त्यानंतर आयोगाने शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह दिलेलं आहे. तसेच काल शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळाले होते. तेव्हा आता बाळासाहेबांची शिवसेना ढाल तलवारीने ओळखली जाणार आहे.
या आधी शिंदे गटाकडून जी चिन्ह देण्यात आली होती त्यात उगवता सुर्य, त्रिशूळ आणि गदा यांचा समावेश होता. त्यातील उगवता सुर्य हे तमिळनाडूत द्रमुक पक्षाचे आरक्षित चिन्ह असल्याने नाकाराण्यात आले होते. तर त्रिशूळ आणि गदा ही धार्मिक चिन्ह असल्याचे कारण देत बाद करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत शिंदे गटाला नवीन चिन्हांचे पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले.त्याप्रमाणे शिंदे गटाकडून सकाळी चिन्हांचा ईमेल पाठविण्यात आला त्यातील ढाल-तलवार शिंदे गटाला मिळालेलं आहे. काल ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळालं होतं, तेव्हा आता राजकीय मैदानामध्ये मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना रंगणार आहे.