शिंदे सरकार आता अॅक्टिव्ह मोडवर; अमित शाहांशी चर्चा करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळालं आणि पक्षाचं नाव देखील मिळालं. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राजकीय भूकंप झाला पण शिंदेंच्या गटात मात्र आनंदाचे वातावरण आहे.शिंदे-फडणवीस सरकार येवून आठ महिन्यांचा काळ लोटला तरीही अजून मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला नाही. आता शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्या नंतर मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचाली वाढवल्या आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी हा विस्तार करण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा विचार असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती हाती येत आहे. अमित शाह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून आज पुण्यात त्यांची सभा आहे.
उद्या अमित शाह कोल्हापुरात बैठक घेणार आहेत. या बैठकीमध्ये मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकीसंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. मंत्रिमंडळ विस्तारासाठीचा वेग आता शिंदे फडणवीस सरकारने वाढवला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुका तोंडावर असताना आलेला हा निर्णय महत्त्वाचा ठरलाय.