शिवाजी पार्कसाठी शिवसेना न्यायालयात !

शिवसेना दसरा मेळाव्याचा वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. सर्वात आधी परवानगी मागून सुद्धा पालिकेनं अद्याप निर्णय घेतलेला नाही असे सांगत शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. खरंतर गणेशोत्सवापूर्वीच शिवसेनेकडून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, महापालिकेच्या जी-उत्तर प्रभागाने अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. या प्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे आता या प्रकरणावर उद्याच (२२ सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट यापैकी कोणला शिवाजी पार्क मैदानावर परवानगी मिळते या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. शिवसेनेकडून मेळाव्याची जय्यत तयारी होतेय तर शिंदे गट सुद्धा मेळाव्यासाठी सज्ज झालेला आहे. दोन्ही गटाचे अर्ज महापालिकेलेला आधीच मिळाले आहेत पण निर्णय बाकी आहे. आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी असताना अद्याप महापालिकेने निर्णय घेतला नाही म्हणून शिवसेना थेट हायकोर्टात गेलीय. त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत मुंबई महापालिका आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी करण्यात आलेले आहे.
शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळू नये म्हणून राज्य सरकार दबाव टाकत आहे असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येतोय. एक महिन्यांचा कालावधी झाला तरी परवानगीबाबत कोणताही निर्णय झाला नाही. शिंदे गटाला बीकेसी मैदानाची परवानगी मिळालेली आहे. पण शिवेसेनेने मेळावा कुठे घ्यावा हा निर्णय राखून ठेवण्यात आल्याचाही आरोप होतोय. या मेळाव्याला परवानगी देताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगितलं जातंय. पण त्याचा इथे काही संबंध नसल्याचं शिवसेनेने सांगितले आहे.