उद्धव ठाकरेंना सरवणकर यांच्याविरोधात हुकमी एक्का सापडला?

महाराष्ट्रात आता शिंदे आणि ठाकरे गटाचं जोरदार राजकारण दिसून येतंय. जिथे शिंदे गटाचे आमदार खासदार पदाधिकारी आहेत तिथे वाद होणारच असे चित्र आता स्पष्ट झालंय. विधानसभेच्या पायऱ्यांवर तर शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार एकमेकांना भिडले होते.आता तोच वाद मुंबईतसुद्धा झालेला आहे आणि तोसुद्धा थेट शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत. दादर येते शिंदे गट आणि ठाकरे गट यांचा जोरदार राडा झाला आणि त्याचे पडसाद अद्याप ही उमटत आहेत.
गणपती विसर्जनच्या दिवशी एका बाजूला सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर तर दुसऱ्या बाजुला प्रभादेवी दादरचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत होते. दोघांचा उत्साह शिगेला पोहोचला होता एवढ्यात समाधान सरवणकर यांनी ठाकरे गटाला म्याव म्याव म्हणून डिवचायला सुरुवात केली. तिथूनच खरा राडा सुरु झाला. या हाणामारीत विभाग प्रमुख महेश सावंत यांनी शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवण यांना हाणामारी केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला.या राड्यात पोलिसांनी पाच शिवसैनिकांना ताब्यात घेतलं त्यात महेश सावंत यांचाही समावेश होता. ज्या पोलीस ठाण्यात महेश सावंत यांना आणण्यात आलं त्या पोलीस ठाण्यासमोर संतोष तेलवणे आणि समाधान सरवणकरांनी राडा घातला.
या राड्यानंतर महेश सावंत आणि इतर शिवसैनिक पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले आणि त्यांनी थेट मातोश्री गाठलं. तिथे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मावळ्यांचं जोरदार स्वागत केलं महेश सावंत हे खुद्द उद्धव ठाकरे यांच्या बाजूला बसले आहेत तो फोटो सगळीकडे व्हायरल झाला आणि सगळ्यांना प्रश्न पडला कोण आहेत महेश सावंत? वडिल शिवसेनेत असल्यापासून शिवसेनेचे काम करायला सुरुवात केली.
खरंतर महेश सावंत एकेकाळी आमदार सदा सरवणकर यांचे कट्टर समर्थक होते. शिवसेनेचे आंदोलने, सामाजिक उपक्रमात सहभाग यामुळे सावंतांचा परिसरात चांगला जनसंपर्क आहे. 2009 मध्ये सदा सरवणकर यांनी शिवसेना सोडून नारायण राणे सोबत जाण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा महेश सावंत यांनी शिवसेना सोडली होती काही वर्षांनी सदा सरवणकर शिवसेनेत परतले तेव्हा महेश सावंत सुद्धा शिवेसेनेत दाखल झाले. पण २०१७ मध्ये महापालिका निवडणुकित काम करण्याची संधी मिळाली नाही म्हणून सरवणकर आणि सावंत वाद झाला. महेश सावंतांनी अपक्ष म्हणून निवडणुक लढवली पण समाधान सरवणकरांकडून २५० मतांनी त्यांचा पराभव झाला. जेव्हा सदा सरवणकर शिंदे गटात गेले तेव्हा ठाकरेंनी महेश सावंतांना विभागप्रमुख पदाची जबाबदारी दिली. ठाकरेंचा हा निर्णय योग्यच ठरला. आता महापालिका निवडणुकित सदा सरवणकर यांच्या विरोधात लढण्यासाठी सावंत हा हुकमी एक्का सापडलाय अशी चर्चा सगळीकडे सुरु झालीय. पण निवडणुकिच्या आधीच राडा, हाणीमारी सुरु झालीय ती कुठपर्यंत पोहोचणार ते येणारा काळच सांगेल.