महापालिकेच्या ‘त्या’ निकषामुळे ठाकरे गटाला शिवतीर्थावर मिळणार परवानगी? अरविंद सावंतांचं मोठं विधान

दसरा मेळाव्यावरुन राजकारण तापलेलं आहे. शिवाजी पार्क येथे दसरा मेळावा कोण घेणार ठाकरे गट की शिंदे गट यात रस्सीखेच सुरु आहे. शिवतिर्थावर मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटाकडून महापालिकेकडे अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान पालिकेने अदयाप कोणत्याही गटाला शिवतीर्थावर परवानगी दिलेली नाही.
दरम्यान महापालिकेनं बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिली आहे. शिंदे गटानं पहिल्यांदा अर्ज दाखल केल्याने त्यांना पहिल्यांदा परवानगी देण्यात आल्याचा निकष महापालिकेनं लावलाय. यावर शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिलेली आहे.
यावर अरविंद सावंत म्हणाले आहेत आमची शिवसेना आहे.बीकेसी मैदानावर परवानगी मिळावी यासाठी भारतीय कामगार सेनेच्या वतीने अर्ज करण्यात आला होता. आता मला अशी माहिती मिळालीय की, एमएमआरडीने शिंदे गटाला बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिलीय. त्यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला म्हणून त्यांना पहिल्यांदा परवानगी मिळाली हा निकष महापालिकेनं लावलाय. जर हाच निकष असेल तर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्हाला परवानगी मिळाली पाहिजे. शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आम्ही पहिल्यांदा अर्ज दाखल केला होता. त्यामुळे शिवतीर्थावर आम्हालाच परवानगी दिली पाहिजे. पण परवानगी नाकारली तर पुढचा निर्णय घेऊ असे अरविंद सावंत म्हणालेत.