दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा ‘प्लान B’? विचारांचं सोनं कुठून लुटणार?

शिवसेनेत फूट पडल्यामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट तयार झाले आहेत. खरी शिवसेना कोण आणि धनुष्यबाण चिन्ह हा वाद तर सुप्रीम कोर्टात गेलेला आहे. दरम्यान आता दसरा मेळाव्याचा वाद दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. शिवसेनेच्या परंपरेनुसार दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होतो पण आता दोन गट पडल्यामुळे नक्की कोण शिवतिर्थावर दसरा मेळावा घेणार यात चुरस सुरु आहे. दोन्ही गटाकडून महापालिकेकडे रितसर परवानगी मागण्यात आलेली आहे. 

दरम्यान शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी न दिल्यास शिवसेनेने पर्यायांचा शोध सुरू केलाय.शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी एमएमआरडीएला पत्र लिहीत बीकेसीतील मैदानाची मागणी केली आहे. शिवसेनेच्या भारतीय कामगारसेनेच्या मार्फत दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी पत्र लिहिलं आहे. बीकेसीमध्ये दसरा मेळावा आयोजित करता यावा याकरता परवानगीसाठी पत्र लिहण्यात आलं आहे. 

एकीकडे शिंदे गट मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घेण्याचा निर्धार व्यक्त केलाय. शिंदे गटाची या मेळाव्यासंदर्भात काल रात्री उशिरापर्यंत खलबतं झाली. यांत जे काही होईल ते नियमानुसार होईल म्हणत शिवाजी पार्कवरच दसरा मेळाव्याचा सुतोवाच शिंदेंनी व्यक्त केलाय. या बैठकित शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी वांद्रा कुर्ला संकुलाच्या मैदानाचा उल्लेख केला होता. त्यामुळे शिवाजी पार्कवर परवानगी नाही मिळाली तर शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावर होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अशातच आता शिवसेनेनं मागितलेल्या परवानगीमुळं शिवाजी पार्कनंतर बीकेसीतील मैदानासाठीही शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात चढा-ओढ सुरु होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.