एका अटीवर मातोश्रीवर जाऊ, बंडखोर आमदाराचे वक्तव्य

राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यापाठोपाठ शिवसेनेतील आणखी एका बंडखोर आमदाराने, ‘मातोश्रीवरून बोलावणे आल्यास त्याठिकाणी जाऊ’, असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला मातोश्रीवर बोलवावे, असे वक्तव्य शिंदे गटाचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी म्हटले. ते बुधवारी शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मात्र, यासाठी सुहास कांदे यांनी एक अटही घातली आहे. मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ, मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावलं तरच आम्ही सर्व एकत्र मातोश्रीवर जाऊ, असे कांदे यांनी सांगितले.

तसेच आमची खदखद ही संजय राऊतांवर नव्हती तर विकास कामांबाबत असल्याचे सुहास कांदे यांनी म्हटले. ज्या ४० आमदारांच्या मतांवर संजय राऊत खासदार झाले त्यांनाच राऊतांनी ‘रेडा’, ‘डुक्कर’ असे म्हटले, असे सांगत सुहास कांदे यांनी त्यांच्याविषयीची नाराजी व्यक्त केली.

सत्ता स्थापनेनंतर मतदार संघात येताच नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी सायंकाळी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली. गुवाहाटी, गुजरात गोव्याला होतो त्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी प्रार्थना साईबाबांना केली होती.बाबांनी माझ्या झोळीत ती भेट टाकली आणि मला न्याय दिला त्यामुळे साईबाबांचे आभार मानण्यासाठी सपत्निक दर्शनासाठी आल्याचे कांदे म्हणाले. हे राज्य शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून मुक्त व्हावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा असे साकडं साईबाबांना घातले. मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो, न देवो माझा माणुस ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले त्यांना मुख्यमंत्री पद मिळाले आहे. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन, असे कांदे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.