सुहास कांदे-शिवसैनिक आमने-सामने ! पुढे काय झाले?

शिवसेने पुन्हा एकसंघपणे उभारण्यासाठी युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी कंबर कसली आहे. राज्यभर शिवसंवाद यात्रा घेवून आदित्य शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य जागृत करत आहेत. आदित्य यांच्या यात्रेला राज्यातून चांगलाचा प्रतिसाद मिळत आहे. आज नाशिक जिल्ह्यात आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा आहे. मनमाड येथे आदित्य शिवसैनिकांना संबोधीत कऱणार आहेत. आदित्य यांची नाशिकमध्ये शिवसंवाद यात्रा होत असताना एकनाथ शिंदे गटात सामील झालेले सुहास कांदे चर्चेत आलेले आहेत.
शिंदे गटात सामील झालेल्या कांदे यांची चर्चा होण्यामागे एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांना भेटून एक निवेदन देणार अशी चर्चा आहे. सोशल मीडियावर सुहास कांदे यांची पोस्ट गाजली होती त्यात त्यांनी आमचं काय चुकलं असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारला होता. दरम्यान कांदे हे आदित्य ठाकरेंची भेट घेणार हे समजल्यावर ठाकरे समर्थक संतप्त झालेले आहेत.
सुहास कांदे आपल्या समर्थकांसह आदित्य ठाकरे यांना निवेदन देण्यासाठी आणि प्रश्न विचारण्यासाठी निघाले होते. दरम्यान सुहास कांदे आणि शिवसैनिक आमने सामने आले. तेव्हा ठाकरे समर्थक गटाने जोरदार घोषणाबाजी केली. पोलीसांनी हस्तक्षेप केला आणि सुहास कांदेचा ताफा पुढे जाण्यास मार्ग मोकळा करुन दिला. एकूणच कांदे यांना आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी जमलेल्या शिवसैनिकांचा सामना करावा लागला हे मात्र खरं आहे.
आदित्य ठाकरे जेव्हा काळाराम मंदिरात आले तेव्हा मंदिर परिसरात त्यांना सुहास कांदे यांच्या वक्तव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा आदित्य म्हणाले, सुहास कांदे यांनी भेटण्याची वेळ मागितली असेल तर मी त्यांना नक्की भेटेन पण मंदिर परिसरात राजकारण नको. कारण आमची मंदिरं राजकारण करण्यासाठी नाहीत, कांदे यांना भेटायचे असले तर त्यांनी मातोश्रीवर यावे. मातोश्रीची दारे सदैव त्यांच्यासाठी खुली आहेत असेही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.