शिवसेना संपेल या भ्रमात राहू नका; ‘सामना’तून सोडला भाजपवर बाण

सामनामधून आजही शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेचे बाण सोडण्यात आलेले आहेत. 56 वर्षांत शिवसेनेला संपविण्यासाठी काय कमी प्रयत्न झाले? पण शिवसेना प्रत्येक वेळी नव्या जोमाने आणि तेजाने उसळून वर गेली. त्यामुळे गेल्या दोन-चार महिन्यांत फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने शिवसेना संपविण्याचे जे प्रयत्न सुरू केले, 40 बेइमान लोकांच्या मदतीने जे कारस्थान रचले गेले, त्यामुळे शिवसेना संपेल या भ्रमात त्यांनी राहू नये. असं टीकास्त्र भाजपसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर सामनातून करण्यात आलंय.
इतिहासात तोतयांचे बंड म्हणून एक प्रकरण आहे. त्याचा अभ्यास या मंडळीनी केला पाहिजे. आम्ही कोणत्याही युद्धास तयार आहोत. समोरून या नाहीतर पाठीमागून वार करा. तुमचा प्रत्येक घाव शिवसेनेला महाराष्ट्राला नवे बळ देणार आहे. चाळीस बेइमानांची शिवसेना म्हणे खरी, त्या बेइमानांच्या शिवसेनेशी कमळाबाईची युती आहे, असे शंभरदा रेटून बोलल्याने महाराष्ट्राची जनता तुमच्यावर विश्वास ठेवेल, असे वाटत असेल तर तो भ्रम आहे असेही सामनातून म्हटलेले आहे.
फडणवीसांचे ‘मिंधे’ गोधड्या भिजवत होते तेव्हापासून शिवसेनाप्रमुख शिवतीर्थावरून विचारांचे सोने विजयादशमीस उधळत आले आणि त्याच दिशेने महाराष्ट्र व देश पुढे गेला. त्या बाळासाहेबांनाच आव्हान देण्याइतपत बेइमानांची मजल गेली ती फक्त कमळाबाईच्या नादी लागल्याने खऱ्या अस्सल शिवसेनेचा नाद करायचा नाही व कमळाबाईच्या नादास जो लागला त्याचा कार्यभाग संपला असं म्हणत भाजपवर घणाघाती प्रहार उद्धव ठाकरे यांनी केलेले आहेत.