ममतांसह शरद पवारांवर शिवसेनेची नाराजी? 

आजच्या (८ ऑगस्ट) ‘सामना’ अग्रलेखातून काँग्रेसवर स्तुतीसुमने उधळण्यात आलेली आहेत. देशभऱातील बेरोजगारी,महागाई यामुळे काँग्रेस रस्त्यावर उतरली होती. दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे असे म्हटले आहे.

शिवसेनेने काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेची स्तुती केली असून दुसरीकडे मात्र पं.बंगालच्या  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर विरोधी पक्षांवर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते असे सामनातून म्हटले असून महागाई, बेरोजगारी व ‘ईडी’चा दहशतवाद हा हिंदुस्थानच्या लोकशाहीतील काळा अध्याय आहे. काँगेसची ताकद क्षीण असली पण दिल्लीत सरकारी दहशतीची पर्वा न करता गांधी कुटुंब रस्त्यावर उतरले हे लक्षात घ्यायला हवे. इतर विरोधकांसाठी हा धडा आहे. कोणी खरंच भयमुक्त असेल तर हा धडा घ्यावा असं आवाहनही ‘सामना’मधून करण्यात आलं आहे.

सामनाच्या अग्रलेखातील खास गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कुठे ही उल्लेख केलेला नाही. इतर विरोधी पक्षाची भूमिका संशयास्पद वाटते असे म्हणत सामनामधून अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे.प. बंगालात ‘ईडी’ व ‘सीबीआय’च्या राजकीय कारवाया वाढल्या. त्याचा हा परिणाम नसावा, पण राहुल व सोनिया गांधी यांनाही ‘ईडी’ने घेरले आहे तरी महागाई-बेरोजगारीविरुद्ध ते रस्त्यावर उतरून संघर्ष करीत आहेत. अशा वेळी सर्व मतभेद विसरून विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विरोधकांच्या एकीतच भाजपचे बळ आहे. विरोधकांनी एकत्र येऊ नये यासाठी ‘ईडी’ची दहशत निर्माण केली जाते असे सामनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.