‘मशाल’ मागणारा समता पक्ष हा शिंदे गटाची ‘बी’ टिम असल्याची चर्चा

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांना मशाल तर एकनाथ शिंदे यांना ढाल तलवार चिन्ह देण्यात आलं. या चिन्हावर दोन्ही गट निवडणूकिसाठी सज्ज झाले असताना आता नवे संकट उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभे राहिले आहे ते म्हणजे समता पक्षाने मशाल चिन्ह आमचे असून ते पुन्हा आम्हाला मिळावे असा दावा करणार पत्र तातडीने निवडणूक आयोगाल ईमेल केले आहे. समता पक्षाने मशाल चिन्हावर आपला दावा सांगितल्यामुळे धनुष्यबाणानंतर आता ठाकरेंच्या हातातून मशाल पण जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे.
समता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश अरुण देवळेकर यांनी कोर्टात याविषयी याचिका दाखल केली जाणार असून, अंधेरी पोटनिवडणूकीत आमचा उमेदवार देखील असेल असे स्पष्ट सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांना मिळालेले मशाल चिन्ह गोल आकाराचे असून भगव्या रंगात आहे.तर समता पार्टीचे चिन्ह मशाल दोन रंगांत असून खाली आणि वर हिरवा, तर मधल्या पट्ट्यात पांढरा रंग आहे. पण मतदान पत्रिकेत किंवा मतदान यंत्रावर सफेद व काळ्या रंगात चिन्ह असतात मग तिथे दोन्ही चिन्हे एकसमान दिसणार आणि मतदारांचा संभ्रम होणार असे ही स्पष्ट करण्यात आलेले आहे. तेव्हा पुन्हा चिन्हासाठी ठाकरे यांचा संघर्ष अटळ आहे हे निश्चित झालंय.
दरम्यान उद्धव ठाकरे यांची निवडणुकीत कोंडी करण्यासाठी शिंदे गटाने ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.समता पार्टीचे देवळेकर यांची शिंदे गटातील आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी जवळीक असल्याची चर्चा कल्याणमध्ये रंगलेली आहे. भविष्यात समता पार्टी ही शिंदे गटाची बी टीम असेल अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे.