बहिणीने भावाकडून शिवसेनेचं कार्यालय घेतलं परत !

जळगावमधील पाचोरा विधानसभेचे आमदार किशोर पाटील यांनी शिंदे गटाला साथ दिलेली असली, तरी त्यांच्या भगिनी वैशाली सुर्यवंशी यांनी उद्धव ठाकरेंबरोबर एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतलेला आहे.आता सुर्यवंशी यांनी शिवसेना संपर्क कार्यालय आपल्या ताब्यात घेतलं असून कार्यालयावर असणारा आमदार किशोर पाटील यांच्या नावाचा फलक काढण्यात आलेला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावरची निष्ठा आणि माझे वडील स्व.तात्यासाहेब आर.ओ.पाटील यांनी दाखवलेल्या मार्गावर मी चालते आहे. अनेक संकटे माझ्यासमोर आली आणि आता पुढेही येत राहणार आहेत. तरी, या सर्व गोष्टींचा विचार करून मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून मी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि एकनिष्ठ होऊन काम करेन असा शब्द ही त्यांना दिला. पक्षाकडून माझ्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल, ती मी स्वीकारेन असे वैशाली सुर्यवंशी स्पष्ट केले आहे. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला ९ ऑगस्टपासून सुरुवात होते आहे. पाचोऱ्यातून ते शिवसंवाद यात्रेचा आरंभ करणार आहेत. यासंदर्भात पाचोऱ्यात शिवसेनेतील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यर्त्यांची बैठक झाली त्या आधीच आमदार किशोर पाटील यांच्या कार्यालयावर बहिणीने ताबा मिळवला.
९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शिवसंवाद यात्रेची जय्यत तयारी वैशाली सुर्यवंशी यांनी सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी भावाचे कार्यालय ताब्यात घेतलेले आहे. हे कार्यालय जिथे आहे तिथेच वैशाली यांची खासगी मालमत्ता आहे. या प्रकारामुळे येत्या काळात पाचोऱ्यात भावा बहिणी विरुद्ध सामना पहायला मिळणार यात शंकाच नाही.