‘ईडीच्या भीतीनेच शिंदे भाजपासोबत’, ‘सामना’मधून पुन्हा टीका

शिवसेनेचे मुखपृष्ठ असणाऱ्या सामनामधून पुन्हा एकदा शिंदे गट आणि भाजपवर ताशेरे ओढण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक हे ईडीच्या भीतीने भाजपासोबत गेल्याचा दावा शिवसेनेन केला असून “मुख्यमंत्री हे विचित्र मनुष्यप्राणी आहेत,” असंही म्हटल आहे.
बाळासाहेब ठाकरेंचे नेमके कोणते विचार एकनाथ शिंदे गट पुढे नेत आहे असा प्रश्न विचारताना राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाने मवाळ भूमिका घेतल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. या मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्र दौरा काढला आणि त्यांच्या समर्थक आमदारांच्या भागात ते तुताऱ्या फुंकून आले. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने अगदी गमतीची आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून क्रांती, उठाव असे शब्द येऊ लागले आहेत,” अशा खोचक शब्दांमध्ये शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून शिंदे यांच्यावर टीका केलीय
भाजपच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी त्यांनी शिंदे आणि त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही असेही सामनामध्ये म्हटले आहे