अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ठाकरेंचा ‘प्लान बी’; नवा उमेदवार उभा करणार?

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे पण प्रशासकिय सेवेतील त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यातच ऋतुजा लटकेंना आपल्याकडे वळवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे प्रयत्नशील असल्याचे बोलले जातेय. तेव्हा मातोश्रीवर ठाकरे गटाने ‘प्लॅन बी’ तयार ठेवला आहे. ठाकरे गटाकडून दुसरा उमेदवार देण्याची तयारी सुरु झालेली आहे. ऋतुजा लटके आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या चर्चेनंतर ठाकरे गट सावध झाला असून अंधेरीमधील दुसऱ्या एका शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी ठाकरे गटाने सुरु केलेली आहे.
ठाकरे आणि शिंदे यांच्यातील संघर्ष राज्यात आता अधिकच तीव्र होतो आहे. ऋतुजा लटके यांनाच शिंदे गटात आणण्याचा जोरदार प्रयत्न शिंदे गट करतोय. त्यात ऋतुजा लटके आणि त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांना भेटल्याच्या चर्चांना उधाण आलंय.वर्षा निवासस्थानी ही भेट झाल्याचे सांगण्यात येतेय. तेव्हा आता ऋतुजा लटके शिंदेंना समर्थन देण्यार का? असा प्रश्न पडला आहे. समजा तसे झाले तर नवा पर्याय काय यासाठी ठाकरेंकडून चाचपणी सुरु झाली आहे. जर ऋतुजा लटके शिंदे गटात सामील झाल्यास ठाकरे गट नवा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळालेली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अशी ही चर्चा आहे की अंधेरी पोटनिवडणुकीमधून भाजप माघार घेऊन शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही जागा सोडली जाऊ शकते.