उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाविरोधात दंड थोपटले, हायकोर्टात धाव

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने आता दिल्ली हायकोर्टात धाव घेतलेली आहे. ठाकरे गटाकडून रिट याचिका दाखल करण्यात आलीय. यात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात दाद मागण्यात आली असून निवडणूक आयोगाने आमची बाजू मांडण्याची संधीच दिली नाही. तसेच प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नवा गोठवण्याचा निर्णय घेतला असे म्हटले असून निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला तातडीने स्थगिती द्यावी अशी मागणी सुद्धा ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे.तेव्हा आता दिल्ली हायकोर्ट काय निकार देत आहे याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
दरम्यान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टा ऐवजी हायकोर्टात याचिका का दाखल केली, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्याचे कारण समोर आलेले आहे केंद्रीय निवडणूक आयोगाचे कार्यालय हे दिल्ली हायकोर्टाच्या अखत्यारित येते. त्यामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता हायकोर्ट निवडणूक आयोगाच्या निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करणार का, हे मात्र पाहावे लागेल. ठाकरे गटाच्या या याचिकेवर आज किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घाईघाईत सगळे निर्णय घेतले. या सगळ्या गोष्टी आम्ही याचिकेत मांडलेल्या आहेत. त्यामुळे हायकोर्ट काहीतरी हस्तक्षेप करेल अशी आशा ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी व्यक्त केलीय.