तुमचा ‘युज अँड थ्रो’च होणार; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाच्या आमदारांना इशारा

केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरते धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे तसेच शिवसेना या नावाचा वापर देखील ठाकरे आणि शिंदे गट यांना करता येणार नाही असा निकाल शनिवारी रात्री देण्यात आला.या निकालामुळे आता पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर टीका केली जातेच आहे. दरम्यान आज फेसबूक लाईव्हमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप या बंडखोर आमदारांचा फक्त उपयोग करून घेत आहे असे
उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरें यांनी आज बोलताना शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे म्हणाले की, हा जो मिंधे गट आहे त्यांचा भाजप उपयोग करुन घेत आहे. त्यांना ते कळतच नाहीए. याबाबत उदाहरण देताना उद्धव ठाकरे यांनी टीव्हीवरील अमिताभ बच्चन यांच्या सरबताच्या जाहिरातीचे उदाहरण दिले. अमिताभजी सरबताची जाहीरात करतात. ती जाहिरात पाहिल्यानंतर आपण चांगल्या दुकानातून किंमत देऊन ती बाटली विकत घेतो, बाटली घरी आणल्यानंतर ती जपून वापरतो फ्रीजमध्ये ठेवतो, पण जेव्हा ते सरबत संपत आपण काय करतो तर ती रिकामी बाटली कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. तसच या बंडखोर आमदारांचे होणार आहे. यांचा उपयोग आता संपत चालला आहे. चिन्ह गोठवून झालेलं आहे. आता यांचा आणखी काय उपयोग राहीला आहे का ?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.