उद्धव ठाकरे ऑन फायर मोड !

“ब्रिटिशांना जे हवे होते, मोगलांना जे घडवायचे होते ते भाजपवाले मराठीजनांकडूनच घडवू पाहत आहेत. फोडा, झोडा आणि मजा पाहत राज्य करा, अशी भाजपची नीती आहे. मराठी माणसांमध्ये झुंजी लावण्याचं काम भाप करत आहे. मराठी माणूस भाजपच्या हातातील मोहरा बनला आहे. आता काय तर म्हणे त्यांचे ‘मिशन मुंबई’ सुरू झाले आहे! हे मिशन मुंबई म्हणजे दिल्लीच्या बादशाहीचे ‘कमिशन मुंबई’ आहे”, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या मुंबई मिशनचा समाचार घेतला आहे. ठाकरेंना टक्कर देऊन दसरा मेळाव्याची तयारी सुरु केलेल्या एकनाथ शिंदे गटालाही आजच्या सामना अग्रलेखातून ठाकरी भाषेत खडे बोल सुनावण्यात आले आहेत.
“शिवतीर्थावरच दोन तट पाडून कमळाबाईचा भाजप आज आनंदाने नाचत आहे, पण ते स्वप्नरंजनात दंग आहेत. गुजरातमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात चरस-गांज्यांचे पीक आले आहे. त्या चोरट्या गांजांची नशा मिशन मुंबईवाल्यांना चढली असेल तर शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यातच ती उतरविण्याचे बळ आई जगदंबेने महाराष्ट्रीय मनगटात दिले आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला ललकारलं आहे.
“अलीकडे म्हणे ‘राजकीय’ शिवतीर्थावर भाजपवाल्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. त्या काही प्रेमाचा पान्हा फुटला म्हणून नाही, तर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस जितका अपशकून करता येईल तेवढा करावा यासाठीच. शिवसेनेशी समोरून दोन हात करता येत नाहीत. मग फोडा-झोडा-मजा पहा. आपापसात झुंज लावा ही ब्रिटिश नीती अवलंबली जात आहे. अर्थात या बेइमान बाटग्यांचा समाचार घेण्यासाठी महाराष्ट्राची जनता सक्षम आणि सामर्थ्यवान आहे”.असे ही सामनात म्हटले आहे.