देशभरात आजपासून सिंगल-यूज प्लास्टिक बॅन !

देशात एकेरी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या वस्तूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून म्हणजेच, 1 जुलै 2022 पासून देशभरात सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. याअंतर्गत प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू बंद केल्या जाणार आहेत. यामध्ये दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचाही समावेश आहे. नव्या नियमांतर्गत ज्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं त्या वस्तूंची यादी जाहीर केली आहे.
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे काय?
सिंगल यूज प्लॅस्टिक म्हणजे, प्लास्टिकपासून बनवलेल्या अशा वस्तू, ज्याचा आपण एकदाच वापर करू शकतो. त्या वस्तूंचा एकदा वापर केल्यानंतर फेकून द्यायच्या असतात. जर या वस्तूंचा वापर सातत्यानं केला, तर मात्र त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. तसेच, यामुळे आरोग्यालाही हानी पोहोचण्याचा धोका संभवतो.
‘सिंगल यूज प्लास्टिक’च्या ‘या’ गोष्टींवर बंदी
प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या),प्लास्टिक स्टिक असणारे ईअर बड्स,फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक,प्लास्टिकचे झेंडे,कँडी स्टिक, आयसक्रीम स्टिक,थर्माकोल (पॉलिस्ट्रिन),प्लास्टिकच्या प्लेट,प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास,चमचे,चाकू,स्ट्रॉ,ट्रे,मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद,इन्विटेशन कार्ड,सिगरेटचं पॅकेट,100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर,स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी)
जर कोणी Single Use Plastic चा वापर करताना आढळलं तर, त्यांना शिक्षा केली जाईल, असं पर्यावरण मंत्रालयाकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. कोणी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करत असेल, तर तुरुंगवास आणि दंड या दोन्ही शिक्षांची तरतूद करण्यात आली आहे. पर्यावरण संरक्षण कायदा (EPA) कलम 15 अंतर्गत एकेरी वापरल्या जाणार्या प्लास्टिकच्या वापरावर कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.