नुपूर शर्मा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले

सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्माच्या विधानावरुन तिला चांगलंच सुनावलं आहे. तिने आणि तिच्या बेताल वक्तव्यांमुळे संपूर्ण देश पेटला आहे. तिचं हेच विधान आणि त्यामुळे झालेला आक्रोश उदयपूर येथील दुर्दैवी घटनेला जबाबदार आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे.
तुमच्यामुळे वातावरण बिघडले, देशाची माफी मागा !
सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं आहे की, तिने माफी मागितली आणि पैगंबरांबद्दलच्या टिप्पण्या मागे घेतल्या. पण माघार घेण्यासाठी एक दिवस उशीर झाला. सुप्रीम कोर्टाने तिच्या तक्रारीवर एका व्यक्तीला अटक केली आहे, परंतु अनेक एफआयआर असूनही दिल्ली पोलिसांनी तिच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. ती एका पक्षाची प्रवक्ता आहे, तिच्या डोक्यात सत्ता गेली आहे. असे लोक धार्मिक नसतात. कारण धार्मिक लोक प्रत्येक धर्माचा आदर करतात, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. देशातलं तापलेलं वातावरण पाहता नुपूर शर्माने आता देशाची माफी मागावी, असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
या सुनावणी दरम्यान, नुपूर शर्मा यांचे वकील अॅड. मनिंदर सिंह यांनी सांगितले की, टीव्हीवर काही पॅनलिस्ट वारंवारपणे शिवलिंगाबाबत अपमानास्पद वक्तव्ये करत होते. नुपूर शर्मा यांचा कोणत्याही धर्माचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. कोर्टाची ही भूमिका असेल तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असेल असे सिंह यांनी म्हटले. तर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत काही जबाबदारीदेखील असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. एकच एफआयआर योग्य ठरवायचे असल्यास हायकोर्टात दाद मागा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. दिल्लीतील एफआयआरचे काय झाले, असा प्रश्न करताना दिल्ली पोलिसांनी तुमच्यासाठी रेड कार्पेट अंथरले असावे, असे कोर्टाने म्हटले.