मुंबईमध्ये १ ऑगस्टपासून टॅक्सीचा संप?

मुंबईकरांचे आयुष्य घडाळ्याच्या काट्यावर धावत असते. मात्र १ ऑगस्टपासून मुंबईकरांचा वेग मंदवण्याची शक्यता आहे कारण मुंबई टॅक्सीमन युनियनने संपाची हाक दिलीय. मुंबईमध्ये प्रवास करताना टॅक्सीची वापर सर्रास केला जातो पण १ ऑगस्टपासून मुंबईचे टॅक्सीवाले संपावर जाणार आहेत. सरकार टॅक्सी भाडेवाढ संबंधात काही निर्णय घेत नाही म्हणून टॅक्सी चालकांनी संपाची हाक दिलेली आहे.
मुंबई टॅक्सीमन युनियनने सरकारकडे टॅक्सीच्या भाड्यामध्ये १० रुपयांनी वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपये आहे ते थेट ३५ रुपये करण्याची मागणी संघटनेतर्फे करण्यात येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील काही ऑटोरिक्षा संघटनांचे असे म्हणणे आहे की ३१ जुलै पर्यंत सरकारच्या भाडेवाढ संदर्भात वाट पहायची. समजा त्यात यश नाही आलं तर १ ऑगस्टपासून टॅक्सी संपाला रिक्षाचालक पाठिंबा देण्याची शक्यता आहे. ऑटो युनियनने रिक्षाच्या किमान भाड्यात ३ रुपये वाढीची अपेक्षा केली आहे.
टाईम्स ऑफ इंडियासोबत बोलताना टॅक्सी युनियनचे नेते ए एल क्काड्रोस म्हणाले, सीएनजीचा दर ४८ रुपयांवर थेट ८० रुपये झाला आहे.सरकारला आम्ही शिफारस केली होती सीएनजी २५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढला तर टॅक्सीचे भाडे सुधारित करायला हवे. त्यामुळे आमची मागणी योग्यच आहे. दररोज होणारी इंधन दरातील वाढ त्याचबरोबर टॅक्सीचा मेन्टेन्स यामुळे टॅक्सीचालकाला दररोज ३०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.यावेळी बोलताना क्काड्रोस यांनी वाहतूक पोलिसांकडून आकारण्यात येणाऱ्या भरमसाठ दंडाचा ही जोरदार विरोध केला.