ठाकरे, शिंदेंमध्ये नवा वाद; कुरघोडीच्या राजकारणात कोणाचा गेम?

शिवसेना नाव वापरता येणार नाही तसेच धनुष्यबाण चिन्ह तात्पुरत्या काळासाठी गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर आता दोन्ही गटाला नवे नाव आणि नवे चिन्ह द्यावे लागणार आहे. आता येथेच ठाकरे आणि शिंदे गटाचा मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे. दोन्ही गटांनी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ या नावाची मागणी केलेली आहे. आता दोन्ही गटाने एकाच नावाचा दावा केला तर ते नाव कोणत्याच गटाला दिले जात नाही. निवडणूक आयोगानं आतापर्यंत अनेकदा अशाप्रकारचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे गटांना ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नाव मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

धनुष्यबाण ही जशी शिवसेनेची ओळख आहे त्याचप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हीदेखील शिवसेनेची ओळख तर दशकांपासून आहे. जेव्हा शिवसेनेचे फूट पडली तेव्हा बाळासाहेबांची शिवसेना असा दावा दोन्ही गटांकडून सतत केला जातो आहे.
‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ असे नाव दिल्यास शिवसेनेच्या मतदारांना थेट कनेक्ट करता येईल असा दोन्ही गटांचा निकष आहे. त्यामुळेच दोन्ही गटांनी या नावावर दावा सांगितला आहे. मात्र एकाच नावावर दोन्ही गटांनी दावा केल्यास कोणालाच ते नाव दिलं जात नाही अशी राजकारणात अनेक उदाहरणे आहेत.

पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्यात आल्याने ठाकरे आणि शिंदे गटासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे. दोन्ही गट कोणते नाव आणि चिन्ह निवडणार याबद्दल राज्याला उत्सुकता लागलेली आहे.दोन्ही गटांना शिवसेना नाव वापरता येणार नाही. मात्र त्यांना शिवसेनेशी संबंधित नाव वापरता येईल. त्यामुळे शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) अशी नावं घेतली जाऊ शकतात. बंड केल्यानंतर दोन्ही गटांनी एकाच चिन्हावर दावा सांगितला होता तेव्हा ते चिन्ह तात्पुरते का होईन पण गोठविण्यात आले. तसे पाहिले तर ठाकरे आणि शिंदे गटाला याची कल्पना होती. म्हणूनच दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्यात नव्या चिन्हाबद्दल संकेत देण्यात आले होते. तुम्हाला आठवत असेल शिंदे यांनी बीकेसीमधील मेळाव्याची सुरुवात तलवार पूजनाने केली होती. तसेच व्यासपीठासमोर असलेल्या जागेत ५१ फूट लांब तलवारीची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. तर ठाकरे गटानं गदा शिवतीर्थावरील मेळाव्यात शस्त्रपुजनावेळी गदेचा उल्लेख वारंवार केला होता. त्यामुळे त्यांचे चिन्ह गदा असू शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.