ठाकरे सहानुभूमीचा हुकमी एक्का बाहेर काढणार?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी सध्याचा कसोटीचा काळ सुरु आहे. प्रत्येक पावलावर त्यांना परीक्षा द्यावी लागतेय.ठाकरेंच्या अस्तित्वावर घाला घातला जातोय पण आता ठाकरे आपल्या भात्यामधलं एक हुकमी अस्त्र काढण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे शिंदे-फडणवीसांची कोंडी होवू शकतेएकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर मविआ सरकार पडले आणि शिंदे सरकार आले. शिंदे गटात रोजचं इनकमिंग सुरु आहे. आता तर पक्षाचं नाव गेलं, चिन्ह गेलं, ठाकरेंना अगदी छोट्या छोट्या गोष्टी मिळविण्यासाठीसुद्धा झगडावं लागतंय.
तुम्ही पाहिलं असेल इतिहात पहिल्यांदा दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरेंना कोर्टाची पायरी चढावी लागली, जोरदार संघर्ष करावा लागला. अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीबाबतही तेच घडलं.ठाकरे समोर जणूकाही अडचणींचा डोंगर उभा राहिलेला आहे. पण या अडचणींवर मात करण्यासाठी ठाकरे आता आपल्या भात्यातील एक महत्त्वाचं अस्त्र बाहेर काढणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी थेट ठाकरे ब्रँण्डला साद घातली आहे. सहानुभूतीचे कार्ड पुढे केल्याचा आजवरचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा ठाकरे ब्रँण्ड अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा मुंबईतला मराठी माणूस आणि शिवसैनिक भावनिक होतो आणि ठाकरे सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होतात. आता सुद्धा ठाकरेंकडून त्याच खेळीला सुरुवात झालीय.
शिंदे- भाजपची प्रत्येक चाल त्यांच्यावरच उलटत आहे असे चित्र दिसू लागले आहे.ठाकरेंच्या भावनिक ट्र्रपमध्ये ते फसत चालले आहे असेच वाटते आहे. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काही मुद्दे पुढे केले जातायेत. चिन्ह गेले, पक्ष गेला, शिवसेनेची ओळख पुसली गेली. शिवतिर्थ मिळविण्यासाठी ठाकरेंना संघर्ष करावा लागला. लटकेंच्या उमेदवारीसाठी पावलो पावली संकटं आली. ज्यांना पदं दिली त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. ठाकरे नावाच्या मुळावरच भाजप-शिंदे गट उठलाय. ही ठाकरे नावाच्या अस्तित्वाची, मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे असे मुद्दे पुढे केले जात आहेत म्हणून तर भाजपने शिवसेनेला रडकीसेना असे नाव ठेवा असे सांगितले आहे. शिंदे-भाजप गट मनपातील भ्रष्टाचार, मुंबईमधील खड्डे असे अनेक मुद्दे पुढे करु शकतो.
भाजपने गेल्या वर्षाभरात मुंबई महापालिकेतील अनेक भ्रष्ट्राचार बाहेर काढून शिवसेनेवर ताशेरे ओढलेले आहेत. पण आजवर जेव्हा जेव्हा ठाकरे भावनिक कार्ड बाहेर काढतात तेव्हा तेव्हा त्यांना भरघोस यश मिळाले आहे. मग ते आदित्यला सांभाळा, उद्धव ला सांभाळा अशी बाळासाहेबांनी घातलेली भावनिक साद असो वा ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती म्हणून आदित्य ठाकरे यांनी लढवलेली निवडणूक असो, आता शिंदे फडणवीसांना भावनेच्या राजकारणात अडकवायची तयारीत ठाकरेनी सुरू केली आहे. भावनिक राजकारणाच्या खेळात ठाकरे शिंदे फडणवीसांना भारी पडतात की शिंदे-फडणवीस हे ठाकरे यांचा हुकमी एक्का निष्प्रभ करतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे