शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला येणार? शिंदेंची ठाकरेंना ‘ही’ अट

गेल्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकीय वातावरण तापलं आहे. दसरा मेळाव्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही गट आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले असून दोन्ही सांगत आहेत आम्हीच खरी शिवसेना. तेव्हा आता दोन शिवसेना गट तयार झाल्याने दसरा मेळावा कोण घेणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार असे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दरम्यान शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसतील का? असा प्रश्न एका वृत्तवाहिनीकडून आमदार सरवणकर यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरवणकर यांनी सांगितले, ‘असं जर काही दिसलं तर आर्श्चय वाटायचं काही कारण नाही. कारण शिवाजी पार्कच्या मेळाव्यात जे कोणी हिंदुत्वासाठी प्रयत्न करत होते त्यांना एकत्र आणण्याचे काम शिवेसना प्रमुखांनी अनेकदा केलंय. दसरा मेळाव्यात हिंदुत्ववादी विचारांचे पण वेगळ्या पक्षांचे नेते अनेकवेळा आलेले आहेत.त्यामुळे तसं काही दिसलं तर आर्श्चय वाटण्याचे कारण नाही’ असे पुन्हा एकदा सरवणकर यांनी स्पष्ट केलंय.
आता उद्धव ठाकरेसुद्धा म्हणतात ते हिंदुत्वावादी नेते आहेत मग त्यांना तुम्ही बोलणार का? असा प्रश्न सरवणकरांना विचारण्यात आला. त्यावेळी सरवणकर यांनी आधी बाळासाहेबांचे काँग्रेसबद्दलचे विचार सांगितले. ‘माझ्या पक्षाची आणि काँग्रेसची कधी युती होवू शकत नाही आणि राष्ट्रवादीबरोबर जावू शकत नाही आणि समजा तशी वेळ आली तर माझं दुकान मी बंद करेन असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते.शिवसेनाप्रमुखांचे हे विचार आज कुठे आहेत? असा सवाल देखील सरवणकर यांनी केला. उद्धव ठाकेर यांनी दसऱ्यापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तो़डली आणि कट्टर हिंदुत्वावादाचा पुरस्कार केला तर शिंदेसाहेब नक्कीच त्यांना व्यासपीठावर बोलावतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केलंय. आता शिंदे गटातील आमदार सरवणकर यांच्या वक्तव्यावर मातोश्रीवर काय प्रतिक्रिया येते ते पहावे लागेल.