शिंदें गटाचं चिन्ह ठरलं ? धनुष्यबाण गोठवल्यास ‘ हे ‘ असू शकतं शिंदे गटाचे चिन्ह

अवघ्या राज्याचं लक्ष लागलेला दसरा मेळावा अखेर संपन्न झाला. आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे ते निवडणूक चिन्हावर, धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? ते ठाकरेंना मिळणार की शिंदे गटाला याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टाने चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल असा निर्णय दिला होता. सध्या अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे या निवडणूकित चिन्हाचा प्रश्न आहेच. आता धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कायदे तज्ज्ञ सांगत आहेत राज्यातील या पेचप्रसंगात धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जावू शकतं. मग अशा वेळी दोन्ही गटाकडून प्लॅन बी ठरलेला आहे असे संकेत दसरा मेळाव्यात मिळालेले आहेत
एकनाथ शिंदे यांच्या बीकेसी येथील दसरा मेळाव्यात 51 फूट तलवार दिसली होती. तलवारीचं भलमोठं लॅान्चिंग करण्यात आली होती तर मंचाच्याखाली भलीमोठी 51 फूट लांब तलवारीची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांनी 12 फुट लांब चांदीची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट दिली. आता एवढ्या मोठ्या सोहळ्यात धनुष्यबाणाचं लॅाचिंग करता आलं असतं पण तसं न करता खास तलवारीवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न झाला होता. तर शिवतीर्थावर शस्त्रपुजन झाल्यानंतर ठाकरेंनी प्रतिस्पर्ध्यावर हल्लाबोल करताना गदेचा वारंवार उल्लेख केला होता.
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांनी धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. पण जर हे चिन्ह गोठवलं तर इतर चिन्ह काय असतील याचा अभ्यास दोन्ही गटाकडून पुर्ण झाला आहे अशी चर्चा आहे. आता निवडणुक आयोग धनुष्यबाणाचं काय करेल हे सांगता येत नाही. पण दोन्ही गट मात्र नव्या चिन्हाच्या तयारीत दिसत आहेत एवढं मात्र नक्की आहे.