एकनाथ शिंदे यांच्या पोस्टमधील ‘ती’ माहिती खोटी?

आपण खरी शिवसेना हे स्पष्ट करण्यासाठी जास्ती जास्त शिवसैनिकांचा पाठिंबा मिळविण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांच्या गटात समाविष्ट होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. आता शिंदेंना कोणी कोणी पाठिंबा दिलाय याची माहिती त्यांच्या फेसबुकपेजवर झळकली आहे. महाराष्ट्राबाहेरून कोणत्या राज्यातून शिंदेंना पाठिंबा मिळालेला आहे त्यांची नावे आणि त्या राज्यातील प्रमुखांची नावे यांची माहिती शिंदेंच्या फेसबूक पेजवर पोस्टमध्ये आहे.
दरम्यान एक माहिती समोर आली आहे की शिंदेंनी फेसबूक पोस्टवरून जो दावा केला आहे तो खोटा आहे. आपण खरी शिवसेना हे सिद्ध करण्यासाठी शिंदेंनी महाराष्ट्राबाहेरील पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळवायला सुरुवात केली. दरम्यान १२ राज्यातील प्रमुखांनी शिंदेगटाला पाठिंबा दिला आहे असे त्यांनी जाहिर केले. त्यासंबधातील पोस्ट सुद्धा फेसबूकवर शेअर केली. त्यात दिल्ली मणिपूर मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात राजस्थान हैदराबाद गोवा कर्नाटक पश्चिम बंगाल ओडिशा त्रिपुरा राज्यातील प्रमुखांनी पाठिंबा दिल्याचा उल्लेख केलाय. तसेच या संबंधातील फोटोसुद्धा पोस्ट केलेत. या यादीत उल्लेख केलेले जितेश कामत जे गोव्याचे प्रमुख आहेत त्यांनी मात्र शिंदे गटाला पाठिंबा दिल्याची माहिती नाकारली आहे. आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत असे सांगितले आहे. मी मुंबईत गेलो नाही तसेच अशा प्रकारे अफवा पसरवू नका अशी विनंती कामत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केलेली आहे.