अजित डोवालांनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट ! भेटीचं नेमकं कारण काय?

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असेलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज पुन्हा चर्चा होते आहे. त्याला कारण आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेली भेट. ही भेट म्हणजे एक सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय. मुंबई स्थित राजभवनात ही सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीचे फोटोदेखील समोर आलेले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि अजित डोवाल यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर या भेटीदरम्यान चर्चा झाली. मात्र चर्चेत नेमकं काय घडलं, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनीच थेट कोश्यारी यांची भेट घेतल्यानं तर्क वितर्कांना उधाण आलं आहे.अद्याप भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो ट्वीट करण्यात आले आहेत. यातील एका फोटोमध्ये अजित डोवाल यांच्याकडून राज्यपालांना पुष्पगुच्छ देण्यात आल्याचं दिसून येतंय. तर दुसऱ्या फोटोमध्ये दोन्ही दिग्गजांमध्ये चर्चा होत असल्याचं पाहायला मिळालंय.