शिवसेना-भाजपच्या १३ मंत्र्यांचा शपथविधी होणार ?

शिंदे-फडणवीस सरकारच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तारातील पहिला टप्पा 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यात 13 मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती आहे. यात भाजपाचे 8 आणि शिंदे गटाचे 5 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. 11 जुलैला सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर, शपथविधी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपा पक्षश्रेष्ठींची भेट झाली. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार याची यादी आणि तारखा यावर बराच खल झाल्याची माहिती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारे साडे चार तास याची चर्चा झाली. 16 आमदारांच्या निलंबनाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. त्यासोबतच राज्यपालांनी विश्वासमत चाचणीचे दिलेले आदेश, विधानसभा अध्यक्षांची निवड, एकनाथ शिंदे यांच्या गटनेतेपदाला विधिमंडळाने दिलेली मान्यता याबाबतही शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. या सगळ्या प्रकरणांवर 11 जुलैला सुनावणी होणार आहे. कालच्या शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत याबाबतची चर्चा झाल्याची माहिती आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी द्या
अमित शाहा यांचा सल्ला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी द्या, असे अमित शाहा यांनी सांगितल्याची माहिती आहे. काही नावांसाठी एकनाथ शिंदे आग्रही होते. त्यामुळेच शाहा यांच्या निवासस्थानी काल रात्री सुमारे साडे चार तास चर्चा सुरु होती असे सांगितले जाते आहे. कोणती खाती कुणाकडे जाणार, याबाबतही बराच खल झाली असल्याची माहिती आहे. भाजपाच्या मंत्रिमंडळातही नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना मिळणार की दुसऱ्या कुणाकडे जाणार, याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
भाजपाला 27 तर शिंदे गटाला १४ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांचा गटाला १३ ते १४ मंत्रिमदे मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाच्या वाट्याला २७ मंत्रिमदे येतील अशी माहिती आहे. गृह तसेच राज्याच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित खाती अर्थ, महसूल ही भाजपाकडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तर सार्वजनिक बाँधकाम, एमएसआरडीसी, आरोग्य, शेती यासारखी लोकांशी संबंधित खाती ही शिंदे गटाकडे राहण्याची शक्यता आहे.